श्रीज्ञानेश्वर महाराज सारांश:
कैवल्याचा पुतळा | प्रगटला भुतळा |
योगियांचा जिव्हाळा | ज्ञानोबा माझा ||
माऊली श्रीज्ञानेश्वर महाराज यांचा प्रकट दिन श्रावण वद्य अष्टमीला मानला जातो. हीच तिथी भगवान कृष्णाचा अवतारदिनही असल्याने माऊलीला कृष्णाचा अवतार मानले जाते. अवतार व साधारण जन्म यात फरक असा की अवतार स्वतःच्या इच्छेने, योग्य काळ, देश, धर्म व उद्देश निवडून येतो. देव व संत अवतारांचा उद्देश धर्मसंस्थापन, भक्तरक्षण व अधर्मनाश हा असतो. संत अवतार सत्य-असत्याचा विवेक देण्यासाठी येतात.ज्ञानेश्वर महाराज हे ज्ञानाचाच सगुण अवतार मानले जातात. त्यांचा सर्वात मोठा लोकोपकार म्हणजे ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहून सर्वांना दिला. गीता ही जशी सोनं, तशी ज्ञानेश्वरी म्हणजे सोन्याचे अलंकार. एका ओवीतही जीवन सुशोभित करण्याची ताकद आहे.या प्रकट दिनी संकल्प असा की रोज किमान एक ओवी ज्ञानेश्वरीची वाचावी किंवा ग्रंथाला नमस्कार करावा. ज्ञानेश्वरी ही माऊलीची वाङ्मयमूर्ती आहे, तिला वाचणं म्हणजे माऊलीच्या सत्संगात राहणं. असं केल्यास माऊलीची कृपा निश्चित मिळून अपेक्षित ज्ञान प्राप्त होतं.
संपूर्ण लेख
(श्री देवनाथ महाराज, अंतूर्ली यांच्या चिंतनातून साकार )
अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र |
तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र |
तया आठविता महापुण्यराशी नमस्कार |
माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी ||
सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय.
का होतात अवतार ?
आज माऊली महावैष्णव श्रीमंत ज्ञानेश्वर महाराज यांच्या प्रगट दिनानिमित्त आज त्याविषयी आपण चिंतन करणार आहोत. श्रावण वद्य अष्टमी हा माऊलीचा प्रकट दिनाचा महत्त्वाचा एक असा क्षण की ज्या तिथी मुहूर्तावरते भगवान विष्णूंनी कृष्ण रूपाने जो अवतार धारण केला आणि त्याच्यामुळे कृष्णाचाच अवतार माऊली आहे अशी एक मान्यता आहे आणि तसं संतांचं प्रमाण पण आहे "महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर". तुमचे माझे जे होत असतात ते जन्म असतात . जन्म आणि अवतार या दोनमध्ये खूप मोठा फरक आहे. तो असा – "अवतरती इती अवतारा", जे अवतीर्ण होतात म्हणजे याचा अर्थ असा की जे आपल्या येण्यासाठी जाण्यासाठी स्वतंत्र आहेत, त्यांनी कुठल्या देहामध्ये यावं, कोणत्या काळामध्ये यावं, कोणत्या देशामध्ये यावं, कोणत्या धर्मामध्ये यावं, कुठल्या जातीमध्ये यावं – या विषयीचं पूर्ण स्वातंत्र्य जिथे आहे तो अवतार. देवाचे मत्स्य, कुर्म, वराह, वामन, परशुराम हे अवतार आहेत, या अवतारामध्ये तुम्हाला एक जो वेगवेगळेपणा दिसून येतो तो त्याचं प्रमाण आहे. तसंच संतांच्या बाबतीत आहे. सर्व जाती, धर्म, पंथामध्ये अशा पद्धतीचे भगवत कार्य करण्यासाठी त्यांनी अवतार धारण केले. पण इथे एक आणखीन महत्त्वाचा भाग आहे तो असा, कुठलंही कार्य हे कारणाशिवाय घडत नाही. देवाचे अवतार कशासाठी तर – "धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे" –देवाचे अवतार धारण करण्यामागचं कारण म्हणजे "भक्तापाशी भक्ता राखी पायासी, दुर्जनाते संहारे" – भक्ताचं रक्षण करणं, दुर्जनांचा विनाश करणं. हे देवाच्या अवताराचं कारण आहे.
संतांच्या अवताराला अशी मान्यता आहे. संत काय करतात? "उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा, बोलीले बोले बोल धनी विठ्ठल". संत उजळावयासाठी येतात – काय सत्य आहे, काय असत्य आहे, काय करावं, काय करू नये या विषयीचा विवेक जगाला सांगण्यासाठी संतांचे अवतार असतात. "आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलले जे ऋषी साच भावे वर्ताया" – असं जगद्गुरु तुकोबारायांचं प्रमाण आहे. या दृष्टिकोनातून जर विचार केला तर संतांचे अवतार आणि देवांचे अवतार हे अशा कारणाने आहेत.
माऊलीचा अवतारमाऊलीने अवतार का धारण केला? मी ज्यावेळी याच्यावर विचार करतो तर माझ्या अंतःकरणामध्ये एकच भाव निर्माण होतो आणि तो असा आहे की भगवान गोपालकृष्णाचा ज्यावेळी अवतार झाला त्यामध्ये एक सुंदर घटना पुराणात वर्णन आली आहे की , त्यावेळी वेदांच्या ऋचांनी भगवंताचं गान केले, – त्या ऋचा भगवंताला म्हणतात, "देवा, आम्ही तुझं अशा पद्धतीचं वर्णन करत आहोत, पण तुझ्या प्रत्यक्ष सगुण चरित्रामध्ये सहभागी होण्याचं सौभाग्य आम्हाला मिळावं" अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आणि त्या वेदगर्भी श्रुती गोपीच्या रूपाने अवतीर्ण झाल्या, गाईच्या रूपाने ऋषी अवतीर्ण झाले. हे जसे भगवंताच्या सगुण चरित्रामध्ये सहभागी झाले, तद्वत हाच सिद्धांत माझ्या डोक्यामध्ये येतो. ज्ञानालाही असं वाटलं की मी आतापर्यंत जे काही भगवंताचं वर्णन केलेलं आहे, जे काही ब्रह्मज्ञान सांगितलेलं आहे, तर ते कोणी ते ज्ञान जाणत नसल्याने, सर्वांना हे ज्ञान मिळावं म्हणून ज्ञानानेच निर्गुणाचं सगुण होऊन धारण केलेला अवतार म्हणजे ज्ञानेश्वर महाराज आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणजेच ज्ञान. त्यांनी हा अवतार धारण करून, जस कृष्णाने अवतार धारण करून ज्या लीला केल्या, तशाच माऊलीच्या संदर्भामध्ये जर मुख्य चरित्र पाहिलं तर ते खूप मोठं आहे आणि ते संक्षिप्तपणे सांगता येणार नाही. माऊलीचं चरित्र सांगायचं म्हणजे हृदय द्रवित होतं.
ज्ञानेश्वरी ग्रंथत्यांचा सगळ्यात मोठा लोकोपकार जर कोणता असेल तर त्यांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहून आमच्या हातामध्ये दिला, हाच मोठा अलौकिक उपकार आहे. याच्यासाठी की ज्ञानेश्वरीमध्ये माऊलीने ते सगळं ज्ञान व्यक्त रूपाने त्या ठिकाणी सांगितलं आणि कुणालाही वंचित ना ठेवता सगळ्यांना त्या ज्ञानाचा अधिकार दिला, ही गोष्ट आपल्या ध्यानात येते. ती कशी लीला केली ज्ञानेश्वर महाराजांनी? तर – जशी एखाद्या सुवर्णाची कांब (चिप) आणि त्याचे दागिने सोनाराने घडवावे, तसं गीता ही सोन्याची कांब आणि ज्ञानेश्वर रूपी सोनाराने त्याचे घडवलेले अलंकार म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. "गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी" असं प्रमाणच आहे. "ज्ञानराज माझी योग्याची माऊली, तेने निगमवल्ली प्रकट केले" – त्यांनी हे प्रकट केलं आणि त्याच्यानंतर ही प्रकट झालेली ज्ञानेश्वरी. जसं माझ्या मनात विचार येतो की एखाद्या सराफाच्या दुकानामध्ये असंख्य दागिने आहेत आणि आपण तिथे गेलो, दागिने खूप आहेत आणि घेण्याची पण इच्छा आहे, पण किती माझी कुवत आहे? तसाच हा ज्ञानाचा अथांग सागर – ज्ञानेश्वरी मंदिर. त्याच्यातून माझ्यासाठी किती? माझ्या कुवतीप्रमाणे. नामदेवराय म्हणतात – की एकतरी ओवी अनुभवावी. त्यातली एक ओवी जरी आपण घेतली तरी जसं सुवर्णाचे अलंकार झाले की जस सोन्याचा मूळ सौंदर्याला ते आणखी खुलवतात, तसं या एक ओवीने आपलं जीवन त्या ठिकाणी अलंकृत होतं, धन्य होतं, सुंदर होतं. म्हणून – "वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी"– असं जनाबाई म्हणतात. त्याने कितीही अज्ञानातला अज्ञानी असला तरी त्याला सुद्धा ज्ञान होतं असा जणू वरच आहे. आमच्या हातामध्ये हे ज्ञान ज्यांनी दिले त्या ज्ञानेश्वर महाराजांचं स्मरण करणं हे आमचं आद्यकर्तव्य आहे.
आजचे दिवशीचा संकल्पवास्तविक पाहता, आज आपण ज्ञानेश्वर महाराजांचा प्रगट दिन उत्सव साजरा करतो आहोत, या निमित्ताने एकच संकल्प केला पाहिजे – की आजपासून माऊलीचं स्मरण म्हणून मी ज्ञानेश्वरीचा ग्रंथ रोज नित्याने, एक तरी ओवी का होईना, वाचत जाईन. जस श्रीमद्भागवत ग्रंथामध्ये आरतीमध्ये लिहिलेलं – "ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण", तो भागवताचा ग्रंथ जस श्रीकृष्णाचं स्वरूप आहे, तसंच ज्ञानेश्वरी हे माऊलीचं वाङ्मयमूर्ती आहे. तिला नमस्कार करणं म्हणजेच माऊलीच्या प्रत्यक्ष चरणावर मस्तक ठेवण्यासारखं आहे. ज्ञानेश्वरी ची एखादी ओवी वाचणं, त्या ग्रंथाला हाताने स्पर्श करणं हा माऊलीचा स्पर्श आहे. ज्ञानेश्वरीला वाचणं हा माऊलीचा सत्संग आहे. अशा पद्धतीने, आज ते प्रत्यक्ष नसतानाही या स्वरूपामध्ये आपल्याला त्यांचा सत्संग करता येतो, ज्ञान त्यांच्याकडून घेता येतं. हा अलौकिक उपकार ज्या माऊलींनी केला त्यांचं वारंवार स्मरण करून त्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. आणि या ठिकाणी तुम्हाला सर्वांना पुनश्च एकदा नम्र विनंती करतो – की आजपासून माऊलीच्या या वाढदिवसाच्या किंवा प्रगट दिनाच्या अवताराच्या निमित्ताने आज संकल्प करा की आजपासून रोज नित्यनेमाने मी ज्ञानेश्वरी किमान एक ओवी तरी वाचत जाईन. आणि नाहीच झालं तर निदान ग्रंथाला नमस्कार तरी करेन. पण एकही दिवस त्यांच्या स्मरणाशिवाय जाऊ देणार नाही. असं जर झालं तर निश्चितच माऊलीची कृपा आपल्यावर होऊन, आपल्याला ज्या अपेक्षित ज्ञानाची इच्छा आहे ते प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. असं होवो ही माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो आणि इथे थांबतो. जय श्रीनाथ.
